आमच्या विषयी

अध्यक्षांचे मनोगत
आदरणीय सभासद बंधू आणि
भगिनींनो,
आपणा सर्वांना प्रेमपूर्वक नमस्कार.
संस्थेचे शिल्पकार, आधारस्तंभ सर्वात जास्त काळ अध्यक्षपद भुषवणारे सहकार रत्न
सहकार महर्षी स्व.श्री.एस.जी. हुलवळे साहेब यांच्या पवित्र स्मृतीस विनम्र अभिवादन करून
संस्थेच्या 45 व्या अधिमंडळ सभेला संचालक मंडळाच्या वतीने सर्वांचे हार्दिक स्वागत करतो. देशाचा स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव
साजरा करताना संस्थेने आधुनिकतेची कास धरत सहकाराची नविन परिभाषा सभासदांसमोर RTGS/NEFT व कोअर
बॅंकींगच्या रूपाने मांडली आहे. लवकरच संस्थेची मोबाईल/टॅब बॅंकींग, क्यू.आर.कोड व स्वतंत्र
अॅप सर्व सभासद व तरूण वर्गासाठी आम्ही घेवून येतोय.
आपल्या यशोमंदिर सहकारी पतपेढीच्या संचालक मंडळाची पंचवार्षिक निवडणूक
सन 2020 मध्ये शांततेत
पार पडली त्यात निवडून आलेल्या संचालक मंडळामधून दिनांक 17/02/2020 रोजी अध्यक्ष व उपाध्यक्ष पदाची बिनविरोध एकमताने निवड
झाली. तद्नंतर मध्यंतरीच्या कालावधीत सर्वांना काम करण्याची संधी मिळावी म्हणून
अध्यक्ष व उपाध्यक्ष यांनी आपले पदाचे राजीनामे दिले. सदर राजीनामे रितसर मंजूर
झाल्यानंतर संचालक मंडळाची सभा बुधवार दिनांक 12/10/2022 रोजी अध्यासी अधिकारी मा.श्री. शिरीष कुलकर्णी, उपनिबंधक, सहकारी संस्था ‘‘एन’’
वॉर्ड, कोकणभवन, नवी मुंबई यांच्या
अध्यक्षतेखाली घेण्यात आली. त्या सभेत सन 2020 ते सन 2025 च्या उर्वरित कालावधीसाठी अध्यक्ष पदावर माझी बिनविरोध
एकमताने निवड झाली आणि उपाध्यक्ष पदावर श्री.सुरेश दामू सावंत यांची बिनविरोध
एकमताने निवड करण्यात आली. पदाधिकारी निवडीची प्रक्रिया सक्षमपणे हाताळणारे
अध्यासी अधिकारी मा.श्री. शिरीष कुलकर्णीसाहेब यांना मी संस्थेच्या वतीने धन्यवाद देतो व
सर्व विद्यमान संचालकांना धन्यवाद देवून मी माझे मनोगत आपणापुढे सादर करीत आहे.
कोरोना महामारीमुळे आलेली आर्थिक मंदी आपण सर्वांनी अनुभवली
आहे. आता परिस्थिती हळूहळू पूर्व पदावर येत आहे. तरी ज्या वेगाने आपण प्रगती
करावयास हवी तसा वेग अजून आलेला नाही. तरीही पतपेढीने 45 व्या वर्षात दमदार कामगिरी करून आपली प्रगती सतत उंचावत
ठेवली आहे.
संचालक मंडळास पतपेढीची अशीच चौफेर प्रगती
करण्यासाठी भरपूर काम करावयाचे असून आपल्या पतपेढीच्या नावलौकीकास भर घालणारे
संचालक मंडळ व संस्थेचे अधिकारी/कर्मचारी कटिबध्द आहे. आपल्याकडे अन्य वित्तीय
संस्थेपेक्षा कमी व्याजदराच्या विविध कर्जयोजना व जास्त व्याजदराच्या विविध ठेव
योजना आहेत. सदर योजनेचा लाभ ग्राहकांनी घ्यावा म्हणून आपले प्रयत्न चालू आहे.
पतपेढीच्या तुलनेत बॅंकाकडे कासा ठेवीचे प्रमाण जास्त आहे. त्यामुळे त्यांची नफा
क्षमता वाढते. आपल्याकडे कासा ठेवीचे प्रमाण नगण्य आहे. त्यामुळे सर्वच बाबतीत
खर्चावर नियंत्रण ठेवून आणि प्रभावी कर्जवसुली, प्रत्यक्ष कर्जांवरील व्याजाची वसुली करून आपण नफा
वाढविण्याचा प्रयत्न करतो. आपणही आपले, आपल्या कुटूंबाचे आणि मित्रपरिवाराचे बचत खात्यावरील
व्यवहार वाढवून कासा ठेव वाढविण्याचे प्रयत्न करावेत.
आर्थिक वर्षात पतपेढीच्या ठेवी रू.287.97 कोटी व कर्जे रू.221.90 कोटी असा एकूण संमिश्र व्यवसाय रू.509.87 कोटी इतका केलेला आहे.
संस्थेचा सी.आर.आर.1.12%, एस.एल.आर.27.54% तर सी.आर.ए.आर. 14.96% इतका आहे.
संस्थेचे सर्व संचालक मंडळ, सरव्यवस्थापक श्री.शंकर लक्ष्मण हुलवळे, मुख्य अधिकारी सर्व
कर्मचारी यांनी निस्वार्थ भावनेने संस्थेच्या प्रगतीत योगदान दिले आहे. सर्व सभासद, ठेवीदार, दैनंदिन ठेव प्रतिनिधी व
असंख्य कार्यकर्ते यांच्या एकत्रित प्रयत्नाने यशोमंदिर प्रगतीचा
कळस रचला आहे. शाखावाढीपेक्षा भांडवलवाढ ही कधीही चांगलीच. तरीही येणा-या आगामी
वर्षात नवीन शाखा आपल्या सेवेत रूजू करणार आहोत. विद्यमान संचालक मंडळ आपला अमुल्य
वेळ देवून प्रशासनाच्या मदतीने कार्यविस्तार करून पुढील 5 वर्षात ठेव व कर्ज वाढ
याद्वारे विक्रमी व्यवसाय करून भरगच्च नफा वाढविणे तसेच थकबाकी व एन.पी.ए.चे
प्रमाण कमी करून निव्वळ एन.पी.ए.प्रमाण शुन्य टक्के राखण्यात प्रयत्नशील राहील. वर्तमान
स्थिती बघता जग झपाटयाने बदलून तंत्रज्ञानाच्या रूपाने समोर येत आहे. त्यासाठी
आम्ही सज्ज आहोत. संस्थेला मार्गदर्शन करणारे फेडरेशन, सनदी लेखापाल, कायदेशीर सल्लागार, दैनंदिन बालविकास ठेवप्रतिनिधी, मुल्यांकनकार, आजी-माजी संचालक यांच्या सहकार्याबद्दल आम्ही ऋृणी आहोत.
संस्थेने 500 कोटींच्या वर व्यवसायपुर्ती केली आहे. नफा चांगला
झाल्यामुळे 100 टक्के तरतुदी आम्ही करून इमारत निधी 5 कोटींपर्यंत नेत आहोत. संस्थेच्या या आर्थिक वर्षात काही
अधिकारी वर्ग व कर्मचारी वर्ग सेवा निवृत्त झाले. त्या सर्वांच्या निःस्वार्थ
वृत्तीची संस्थेच्या इतिहासात नोंद घेतली जाईल. वैयक्तिक महत्तम कर्ज मर्यादा रू.1,00,00,000/- तर एकत्रित
महत्तम कर्ज मर्यादा रू.1,25,00,000/- पर्यंत संस्था देत आहे. यावेळी झालेली कर्मचारी वेतन सुधार
ही कर्मचा-यांच्या कामाची पोच पावती आहे.
रोजगार मार्गदर्शन, सहकार परिषदा, मेडीकल कॅम्प्स आयोजित
करण्यात येतील. कुशल कारागिरांची जिथे गरज आहे तिथे वेगळे व्यासपीठ आम्ही देणार
आहोत. संस्थेच्या ठेवी, कर्जे, गुंतवणूका व स्थावर मालमत्ता यावरून संस्थेच्या आर्थिक
स्थितीचे योग्य संतुलन साधल्याचे दिसून येईल व संस्थेचा आश्वासक चेहरा
सभासदांसमोर 500 कोटींच्यावर संयुक्त व्यवसाय गेल्याने विश्वासाहार्य झाला आहे
व ही घौडदौड आम्ही अशीच चालू ठेवणार आहोत.
यशोमंदिर ची गरूड भरारी 500 कोटींवर न थांबता अजून पुढे जावी यासाठी व समाजाचा मानबिंदू यशोमंदिरने बनावे हा
प्रयत्न राहील. त्यासाठी मला अध्यक्षपदाची जबाबदारी दिल्याबद्दल सर्व संचालक मंडळ
व ज्येष्ठ सहका-यांचे आभार मानतो. महाराष्ट्राच्या जडणघडणीत मोलाचा वाटा बजावणा-या
सहकार क्षेत्राचा यशोमंदिर हा भाग आहे ही आपल्या सर्वांसाठी अभिमानास्पद गोष्ट
आहे.
जयहिंद ! जय महाराष्ट्र !! जय सहकार !!!
आपला सहकारी,
(डॉ.श्री.संकेत स.हुलवळे)
अध्यक्ष
यशोमंदिर सहकारी पतपेढी मर्यादित,
संचालक मंडळाच्या वतीने,